महापालिका क्षेत्रात 130, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 10 बाधित
पुणे – शहरात करोनाने कहर माजवला असून, गेल्या 24 तासात तब्बल 122 नवीन करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंतची ही एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. या वाढत्या संख्येमुळे शहर हादरले आहे. तर, दुसऱ्या बाजूला करोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
वाढत्या बाधित संख्येमुळे शहरातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 342 वर पोहचली आहे. गेल्या चार दिवसांपासून बाधितांची संख्या दररोज 70 ते 90 ने वाढत होती. त्यामुळे आठवड्याभरात ही संख्या अजून कमी होईल, असा समज असताना मंगळवारी शहरात तब्बल 122 पॉझिटिव्ह सापडले. दरम्यान, शहरातील विविध रूग्णालयत एकूण 919 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 58 जणांची प्रकृती गंभीर असून, ससून रूग्णालय, भारती हॉस्पिटल, सिम्बॉयसिस, नायडू यांसह खासगी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान आजपर्यंत 203 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 8 हजार 185 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 6 हजार 980 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 997 जणांना विलागीकरण कक्षात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी दिवसभरात करोनामुळे भवानी पेठेतील 70 वर्षीय आणि रामोशीवाडी परिसरातील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर सोमवार पेठेतील 65 वर्षीय महिला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे दि. 11 एप्रिल रोजी ससून रूग्णालयात दाखल झाली होती. मात्र, 12 एप्रिल रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला. या तिघांनाही वेगवेगळे आजार होते.
चार महिन्यांच्या चिमुकल्यासह 9 जणांना घरी सोडले
ससून रुग्णालयात गेल्या 24 तासांत एकही करोनाबाधित रूग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. उलट येथील 9 जणांचे 15 दिवसानंतर दोन्ही नमुने करोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये चार महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनामध्येही समाधानाचे वातावरण आहे. आतापर्यंत ससून रूग्णालयातील 13 जणांना घरी सोडल्याची माहिती प्रशासनाने दिली.