Heart Attack – राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार हार्ट ॲटॅक अर्थात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये १२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हार्ट ॲटॅकने २०२२ मध्ये ३२,४५७ जणांचा मृत्यू झाला असून २०२१ मध्ये २८,४१३ जणांचा मृत्यू झाला होता. कोविड महामारी गेल्यानंतर हार्ट ॲटॅकने मरण पावणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचेही ब्यूरोने अर्थात एनसीआरबीने म्हटले आहे.
करोनामुळे हृदयाच्या कार्यावर प्रभाव पडला असल्याचे अन्यही काही पाहण्यांमध्ये आढळून आले आहे. अचानक होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची आकडेवारीही समोर आली आहे. ही संख्याही मोठी म्हणजे तब्बल ५६४५० इतकी आहे. अचानक झालेल्या मृत्यूंच्या संख्येच्या संदर्भात हा गेल्या तीन वर्षांतील सगळ्यांत मोठा आकडा आहे.
२०२१ मध्ये हा आकडा ५०,७३९ होता. त्यात १०.१ टक्के वाढ होऊन तो २०२२ मध्ये ५६४५० वर पोहोचला आहे. हृदयविकाराचा झटका, ब्रेनस्ट्रोकमुळे मृत्यू होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. या दोन कारणांमुळे २०२० मध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या २८,५७९ होती. २०२१ मध्ये मात्र ही संख्या कमी होत २८,४१३ वर आली होती. त्यात २०२२ मध्ये पुन्हा वाढ होत हा आकडा ३२,४५७ वर गेला आहे.
हृदयविकाराचा झटका येण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उच्च सोडीयम डाएट, व्यायामाचा अभाव, धुम्रपान, अधिक प्रमाणात मद्दय सेवन, शरीराच्या कमी हालचाली यासोबतच जादा हिमोग्लोबीनही हृदयविकाराच्या संदर्भात धोकादायक ठरतो आहे.