बॅंकॉक – म्यानमारमधील सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्रीय समन्वयक आंग सान स्यू की यांची विशेष आव्हान याचिका फेटाळून लावली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्याच्या निर्णयाला स्यू की यांनी या विशेष आव्हान याचिकेद्वारे आव्हान दिले होते. लाच म्हणून माजी राजकीय सहकाऱ्याकडून सोने आणि हजारो डॉलर स्वीकारल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
लष्कराने ७८ वर्षीय स्यू की यांना १ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक केली आणि निवडून आलेल्या त्यांच्या सरकारकडून सत्ता हस्तगत केली. स्यू की यांच्याविरोधात भ्रष्टाचार, देशद्रोह, निवडणूक कायद्याचा भंग आणि करोनाविषयक निर्बंधांचे उल्लंघन आदी आरोपांखाली खटले चालवले जात आहेत. गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्यांमध्ये त्यांना दोषी ठरवून २७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विशेष आव्हान याचिकेवरील सुनावणीसाठी माध्यमांना वार्तांकन करण्यास मज्जाव करण्यात आला होता. तर स्यू की यांच्या वकिलांनाही या खटल्याच्या कामकाजाबाबत माध्यमांशी काहीही बोलण्यास मज्जाव केला केला होता.
ज्या खटल्यांमध्ये दोषी ठरवले गेले आहे, त्यासंदर्भात स्यू की यांनी दाखल केलेल्या सामान्य याचिका यापूर्वीच फेटाळल्या गेल्या आहेत. विशेष आव्हान याचिका फेटाळली गेल्यामुळे आता स्यू की यांना या खटल्यामध्ये दिलासा मिळण्याची कोणतीही शक्यता नाही, असे मानले जाते आहे.