यान्गोन, (म्यानमार) – म्यानमारमधील राष्ट्रीय समन्वयक आंग सान स्यू की यांच्या कोठडीला आज 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. स्यू की यांच्या नजरकैदेची मुदत आज संपत होती. त्यांना आज राजधानी नायपितॉ येथील न्यायालयात हजर करण्यात आले आणि कोठडीला मुदतवाढ देण्यात आली, असे ‘नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ पक्षाने स्यू की यांच्यासाठी नियुक्त केलेले वकील खिन मॉंग झॉ यांनी सांगितले.
स्यू की यांच्या नजरकैदेला मुदतवाढ मिळाल्यामुळे देशात लष्करी शासनाविरोधात सुरू असलेले आंदोलन अधिकच पेटण्याची शक्यता आहे. लष्करी शासनाने इंटरनेट सेवा खंडीत केली आणि आंदोलन चिरडण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्या पार्श्वभुमीवर आजही देशभर जोरदार निदर्शने झाली. मंडाले शहरात काढलेल्या मोठ्या मोर्च्यामध्ये हजारो अभियंते सहभागी झाले ह् ओते. इंटरनेट खंडीत केल्यामुळे यान्गोन शहरातल्या मोर्च्यात तुलनेने कमी आंदोलक सहभागी झाले होते.
सेंट्रल बॅंक ऑफ म्यानमारच्या इमारतीबाहेर शेकडो निदर्शकांनी लष्कराविरोधात जोरदार निदर्शने केली. या ठिकाणी पोलिसांऐवजी लष्कराच्या चिलखती गाड्या, पाण्याचे फवारे मारणारी वाहने आणि सशस्त्र सैनिकांच्या तुकड्याही तैनात केल्या गेल्या होत्या.
निदर्शकांनी हातामध्ये “सीडीएम’ अर्थात सनदशीर असहकार चळवळीला समर्थन देणारे फलक धरले होते. या चळवळीमध्ये देशभरातील डॉक्टर आणि अभियंतेही सहभागी झाले आहेत. लष्करी शासनाकडून लोकशाहीवादी नेत्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत काम न करण्याचे या सर्वांनी ठरवले आहे.