पुणे – इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी 5 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
अडीच महिन्यांनंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा 26 नोव्हेंबरपासून सुरू झाली. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत एकूण 304 कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून यात 1 लाख 7 हजार 30 जागा आहेत. 1 लाख 992 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
आतापर्यंत 30 हजार 544 जणांचे प्रवेश निश्चित झाले असून 76 हजार 486 जागा रिक्त आहेत. 84 हजार 471 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन भरलेले अर्ज लॉक झाले असून त्यातील 84 हजार 115 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 76 हजार 524 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले.
एसईबीसीसाठी 10 हजार 362 प्रवेशाच्या जागा आहेत. त्यासाठी 2 हजार 747 अर्ज दाखल झाले. 1 हजार 441 विद्यार्थ्यांचे पहिल्या फेरीत प्रवेश झाले. यातल्या 8 हजार 921 जागा खुल्या प्रवर्गात वर्ग केल्या आहेत. खुल्या प्रवर्गात पूर्वी 20 हजार 914 एवढ्या प्रवेशाच्या जागा होत्या. त्या आता 29 हजार 835 झाल्या आहेत, अशी माहिती इयत्ता अकरावी विभागीय केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती सचिव मीना शेंडकर यांनी दिली. 2 डिसेंबर रोजी प्रवेश अर्जाच्या भाग-1 ची पडताळणी मार्गदर्शन केंद्र व शाळास्तरावर होणार आहे.