सातारा – लंपी स्किनमुळे सोमवारी जिल्ह्यात 14 जनावरांचा मृत्यू झाला असून आजअखेर 180 गायी व 55 बैल असे 235 पशुधन मृत झाले आहे. जिल्ह्यात महाबळेश्वर वगळता 10 तालुक्यांमधील 143 गावांमध्ये लंम्पी स्किनची लागण झाली आहे.
आजअखेर 3191 गाय व 398 बैल अशा 3589 जनावरांस लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे. आजअखेर 1104 गाई व 67 बैल अशी 1171 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली. लंपी स्किन आजारावर उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनाची संख्या 3 लाख 52 हजार 436 असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आजअखेर बाधित गाव व बाधित गावाचे 5 किलोमीटर परिघातील एकूण 782 गावांमधील गोवर्गीय 1 लाख 96 हजार 186 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमधील गोवर्गीय 1 लाख 50 हजार 914 असे 3 लाख 47 हजार 100 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी 98.50 टक्के असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.