श्रीकांत घाडगे यांच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणा
कामेरी – शेती असतानाही शिक्षणानंतर नोकरीच्या पाठामागे लागणाऱ्या तरुणांना कामेरी येथील युवा शेतकरी श्रीकांत घाडगे यांनी एक अनोखी प्रेरणा दिली आहे. घाडगे यांनी शेतीमध्ये आधुनिक तत्रज्ञानाचा वापर करुन एकरी 110 टनाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेणाऱ्या घाडगे यांचे परिसरातील शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे.
सातारा तालुक्यातील कामेरी येथील युवा शेतकरी श्रीकांत सोपान घाडगे यांनी आपल्या 40 गुंठे म्हणजेच एक एकर क्षेत्रावर 86032 या वाणाची ऊस लागवड केली होती. लागवडीपूर्वी त्यांनी शेतीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत केली होती. त्यानंतर सुपर गोळी ह्यमिक मातीमध्ये मिसळून साडेचार फुट अंतरावर सरी घातली. त्यानंतर 86032 या वाणाची बीज प्रक्रिया केली. 7-8 दिवसांत उगवण सुरु झाल्यावर किटकनाशक व बुरशीनाशकाची बुडक्यात आळवणी केली.
तद्नंतर 30 ते 40 दिवसांनी बाळभरणी करत खताचा डोस दिला. पुन्हा 55 व्या दिवशी संजीवाची फवारणी केली. 90 दिवस झाल्यानंतर पॉवर टिलरच्या सहाय्या ऊस फोडणी करत मळी व रासायनिक खतांचा डोस दिला. 120 दिवसांनी पुन्हा पॉवर टिलरने फोडणी करत कोंबडी खत आणि रासायनिक खतांची भरणी केली. वर्षाभरात घाडगे यांनी पाच संजीवाच्या फवारण्या आणि ठिबकद्वारे पाणी नियोजन केले. त्यामुळे त्यांचा ऊस 54 ते 47 कांड्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला.
सध्या घाडगे यांच्या ऊसाची तोडणी झाली असून त्यांना एकरी 110 टनाचे उत्पादन मिळाले आहे. या ऊस शेतीसाठी त्यांनी 70 ते 75 हजार रुपये खर्च आला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड व नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करून योग्य प्रकारे नियोजन केल्यास आपण शेतीमध्ये विक्रमी उत्पादन घेऊ शकतो हे घाडगे यांनी दाखवून दिले आहे.
घाडगे यांच्या उसाची तोडणी सुरु असताना परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्याच्या ऊसाच्या फडाला भेट देऊन ऊसासोबत आपले फोटोदेखील काढले आहेत. तसेच आम्हालादेखील ऊस शेतीसाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले आहे. घाडगे यांनी शेतीपासून लांब चाललेल्या तरुणांना एकप्रकारे प्रेरणाच दिली आहे. त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.