भुवनेश्वर – येथील प्रख्यात श्री लिंगराज मंदिराजवळ भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या खोदकामात दगडी बांधकाम आढळले. ते दहाव्या शतकातील असल्याचे अनुमान आहे. लिंगराज मंदिराच्या सुशोभीकरण आणि परिसर विकासासाठी खोदकाम सुरू असताना या दगडी बांधकाम दृष्टोपत्तीस पडल्याचे पुरातत्व विभागाचे अधिकारी अरूण मलिक यांनी सांगितले.
ते म्हणाले, आम्हाला या मंदिराच्या एका भींतीवर काही सुंदर शिल्पे कोरलेली आढळली आहेत. तेथील संस्कृत विद्यापीठ पाडल्यानंतर त्याच्या ढीगाऱ्याखाली हे मंदीर बुजले असण्याची शक्यता आहे. आता त्याच्या दुसऱ्या बाजूचे खोदकाम सुरू आहे. त्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी लागेल.
या सुशोभीकरणाच्या कामासाठी यंत्राचा वापर केल्यामुळे या भींतीचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, पुरातत्व विभाग शास्त्रीय पध्दतीचा वापर करून मंदीर सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. 11 व्या शतकातील सुका सारी मंदिराच्या आवारात हे अवशेष सापडले आहेत. हे मंदिर श्री लिंगराज मंदिराच्या जवळच आहे.
28 मंदिरे पुरातन
भुवनेश्वरमधील 28 मंदिरांना केंद्रीय संरक्षित वास्तूंचा दर्जा मिळाला आहे. या मंदिरांची देखभाल पुरातत्व विभागाकडून केली जात आहे.