काबूल – अफगाणिस्तानातील दक्षिणेकडील दोन प्रांतात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या जोरदार धुमश्चक्रीमध्ये किनान 109 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर अन्य 25 दहशतवादी जखमी झाले. अफगाणिस्तानमधील सैन्याच्यावतीने आज ही माहिती देण्यात आली.
कंदहार प्रांतात 70 तालिबानी ठार झाले आणि 8 अन्य दहशतवादी जखमी झाले. “अफगाण नॅशनल डिफेन्स ऍन्ड सिक्युरिटी फोर्सेस’ने अफगाणिस्तानच्या हवाई दलाच्या मदतीने प्रांतीय राजधानी कंदहार आणि शेजारील दंड आदी 7 पोलीस जिल्ह्यामध्ये ही कारवाई केली. अफगाणिस्तानच्या 205 कॉर्प्सने ही माहिती दिली.
शुक्रवारी तालिबानने सैन्याच्या काही तळांवर हल्ला केला आणि कंदहार शहरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्या दरम्यान सुरक्षा रक्षकांबरोबर जोरदार धुमश्चक्री झाली होती, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
दुसरीकडे हेमंड प्रांतात झालेल्या अशाच जोरदार चकमकीमध्ये 39 दहशतवादी ठार झाले आणि 17 जण जखमी झाले. अफगाणिस्तानच्या सैन्याने हवाई दलाच्या मदतीने हमंड प्रांताची राजधानी लष्कर गाहच्या आजूबाजूच्या परिसरात जोरदार कारवाई केली.
यावेळी दहशतवाद्यांचे दोन स्थानिक म्होरके तझागुल आणि नेहमोन हे या कारवाईमध्ये ठार झाले. यावेळी दोन्ही प्रांतात झालेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर लष्करी साहित्य, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा नष्ट करण्यात आला. यावेळी सुरक्षा दलांची किती हानी झाली हे समजू शकलेले नाही.