मुळशीत हुल्लडबाजांकडून 10 हजार वसूल

वाहतूक नियम तोडणाऱ्या 52 जणांवर पौड पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

पिरंगुट – वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मुळशी तालुक्‍यात गर्दी होत आहे. धरण भागात येणाऱ्या पर्यटकांची पौड येथील शासकीय धान्य गोदामाजवळ पौड पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. यात हुल्लडबाजी करणाऱ्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 52 जणांवर आतापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 10 हजार 500 रुपये वसुल करण्यात आले आहे.

पावसाळा सुरू होताच वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मुळशी धरण, पळसे धबधबा, ताम्हिणी घाट, तसेच कोकणात जाण्यासाठी गर्दी करत आहे. विशेषतः शनिवार व रविवार पर्यटकांनी गर्दी जास्त असते. त्यामुळे हुल्लबाजी करणे, वाहन परवाना नसणे, दुचाकीवर ट्रिपलसीट, दारू पिऊन वाहन चालवणे, वाहनात दारू घेऊन जाणे अशा प्रकारांना उधाण आल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने हुल्लडबाजी करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अनेक हौशी पर्यटक मुळशी धरण परिसरात दारू पिंऊन धिंगाणा घालतात, तसेच आपली वाहने रस्त्याच्या कडेला थांबवून वाहनात मोठ्या आवाजात गाणी लावून गोंधळ घालत असतात. अशा त्रासदायक बाबींवर जरब बसविण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. यामुळे इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी पोलीस घेत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.