चांडोली टोल नाक्यापुढे कंटेनरला दोन टेम्पो धडकले
कटरच्या सहाय्याने केबिन कापून चालकाला बाहेर काढले
राजगुरूनगर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरूनगरजवळील चांडोली टोल नाक्यापुढे कंटेनरला दोन आयशर टेम्पो धडकून गुरुवारी (दि. 27) सकाळी सहाच्या सुमारास जोरदार अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर सुमारे 10 किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या अपघातानंतर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून चांडोली (ता. खेड) येथे अमूल डेअरीत दूध वाहतूक करणारी दोन्ही आयशर टेम्पो आहेत. दूध भरण्यासाठी ते शिरोली बाजूकडून राजगुरूनगर (चांडोली) बाजूकडे जात होती. दोन्ही अपघातग्रस्त वाहने शिरोली गावातील आहेत. ते डेअरीत माल भरण्यासाठी बरोबर येत होते.
चांडोली टोल नाक्याजवळ रस्त्यात बंद पडलेल्या कंटेनरवर पहिला टेम्पो धडकला. मागून येणारा त्यावर आदळला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात चालक ओंकार सावंत आणि गणेश दांगट गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. आयशर टेम्पोत अडकलेल्या चालकाला स्थानिकांच्या मदतीने आयशर टेम्पोची कॅबिन कटरच्या सहाय्याने कापून बाहेर काढावे लागले.
महामार्गावर अपघात झाल्याने दोन्ही वाहने जागेवरच अडकून पडली. त्यामुळे भल्या सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावर एका बाजूने वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीमध्ये नोकरदार, रुग्णवाहिका आणि प्रवासी, अडकून पडले. वाहनचालकांना जवळपास दोन तास जागेवरच वाहने उभी करावी लागली.