बेल्हे, (वार्ताहर) – पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी (ता.जुन्नर) येथे टोलनाका असून या ठिकाणी स्थानिक वाहनधारकांची लूट होत आहे. स्थानिक वाहनांच्या स्थानिक वाहन असल्याच सांगूनही या ठिकाणी टोल वसुली केली जात आहे.
या टोल नाक्यावरील कर्मचार्यांची अरेरावी सुद्धा वाढत चालली आहे. हा टोल अनेक वेळा वादाच्या भोवर्यात सापडत असून या ठिकाणी स्थानिकांच्या फास्टटॅगमधून पैसे कापले जात आहेत. महिन्याभरात लाखो रुपये या स्थानिकांच्या वाहनातून हा टोलनाका वसूल करत असल्याचा अंदाज आहे.
स्थानिक वाहनांचे रेकॉर्ड ठेवणार सॉफ्टवेअर यांच्याकडे नसल्यामुळे ही लुटमार सध्या सुरू आहे. सध्या स्थानिक वाहनांचे कोणतेही रेकॉर्ड टोल प्रशासनाकडे नाही कोणते वाहन स्थानिक आहे हे टोल प्रशासनाला कळणे कठीण जात आहे. स्थानिकांची लूटमार कधी थांबणार असा प्रश्न स्थानिक वाहनधारक करत आहेत.
आळेफाटा ही शेतकर्यांसाठी मोठी बाजारपेठ असून कांदा मार्केट येथे आहे तसेच नारायणगाव येथे टोमॅटो मार्केटला जाण्यासाठी शेतकर्यांची या रस्त्यावरून मोठी जा ये असते फास्टटॅग मधून पैसे कट झाल्याने सर्वसामान्य शेतकर्यांना या टोलचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
स्थानिकवाहन धारकांसाठी 330 रुपयांचा मासिक पास असून त्यांनी तो काढून घ्यावा अन्यथा फास्टटॅगमध्ये बॅलन्स कमी ठेवावे. पैसे कट झाल्यास 1033 नंबरवर फोन करून तक्रार करावी. – सागर पवार, व्यवस्थापक, चाळकवाडी टोलनाका
स्थानिक वाहनधारकांकडून टोल प्रशासनाने टोल आकारू नये, स्थानिकांकडून टोल आकारआल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल. – तान्हाजी तांबे, अध्यक्ष, मनसे, जुन्नर तालुका