दिलीपराज चव्हाण
उंब्रज – प्रत्येक बहिणीची माया ही वेडीच असते.गुरूवारी सर्वत्र बहिण भावाच्या अतुट नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोणी प्रत्यक्षात तर कोणी कुरिअरच्या माध्यमातून आपल्या भावासाठी राखी पाठवून हा सण साजरा केला. रक्ताच्या नात्यातील बहिण सातासमुद्रापार असल्याने रक्षाबंधनादिवशी मनगट मोकळे राहिल्याने आतून हूरहूर लागलेल्या भावाच्या हाथावर अनाहूतपणे राखी आली. या प्रसंगाने कर्तव्याच्या बाबतीत कठोर असणारे मन हळवे झाले. हा प्रसंग घडला तो म्हणजे
उंब्रज पोलीस ठाण्याचे अधिकारी अजय गोरड यांच्या बाबतीत. तारळे येथील पोलीस औट पोस्ट येथे आपत्तीग्रस्त गावकऱ्यांना मदत करण्यासाठी महिला महाविद्यालय व उंब्रज पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी मदत वाटप कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांच्या नकळत एक प्रसंग घडला. काहीशा मनोरुग्ण असलेल्या महिलेने कोणालाही काहिही कळायच्या अगोदर सरळ उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या पुढे येत राखी असणारे दोन्ही हात पुढे केले.
यावेळी आपसूक गोरड यांचे मनगट राखी बांधण्यासाठी त्या मायेच्या धाग्यापुढे गेले. (इतर वेळी हेच मनगट भल्याभल्यांना छटी का दूध आठवते )
सदैव रक्षणासाठी सज्ज असणाऱ्या वर्दीतल्या भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी अचानक एका (मनोरुग्ण) बहिणीने राखी बांधली. यानंतर या अनोख्या रक्षाबंधनाची मोठी चर्चा उपस्थितांत सुरू होती. 15 ऑगस्टच्या निमित्ताने सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना ऍवार्ड प्रदान केला होता.
याच दिवशी रक्षाबंधन सण असतानाही बहिणी सातासमुद्रापार असल्याने हा आनंद त्यांना बहिणीसोबत वाटता येत नव्हता. त्यामुळे थोडी खुशी थोडा गम अशी मनस्थिती त्यांची झाली असताना मनोरूग्ण महिलेने बांधलेल्या राखीने एक वेगळीच भेट गोरड यांना मिळाली. मनोरूग्ण महिलेने राखी बांधल्याने गोरड यांचे मन गदगदून गेले होते. त्यांच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असेल असेही त्यांनी यावेळी व्यक्त केले. हा प्रसंग उपस्थितांच्या चर्चेचा विषय बनला होता. या प्रसंगाने सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी मायाफ या ओळी सर्वांसमोर आल्याशिवाय राहिल्या नाहीत.