मुझफ्फरनगर – महाशिवरात्रीनिमित्त गंगाजल घेण्यासाठी मोटरसायकलवरून दिल्लीहून हरिद्वारला जाणाऱ्या भाविकांचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 1 भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अन्य् तीन जण जखमी झाले आहेत. या भाविकांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
संजीव असे अपघातात मृत्यू पावलेल्या भाविकाचे नाव असून ते दिल्लीतील मोहम्मदपूरचे रहिवासी होते. अंकित व रोहित या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना बुढाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीनिमित्त गंगाजल गोळा करण्यासाठी हे चौघेजण दोन मोटरसायकलवरून दिल्लीहून उत्तराखंडमधील हरिद्वारला जात होते. दरम्यान बुढाना-बरौत रत्यावरील चेकपोस्टजवळ भरधाव कारने त्यांच्या वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.