पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी 11 दिवसांत 1 लाख 62 हजार 995 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज पालकांकडून नोंदविण्यात आले. दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाइलवर “एसएमएस’ जात नसल्याची बाबही उघड झाली आहे.
“आरटीई’द्वारे आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून शासनाची परवानगी घेऊन वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणीही सुरू केली आहे. यंदाच्या प्रवेशासाठी राज्यातून 9 हजार 328 शाळांनी नोंदणी केली असून यात 1 लाख 15 हजार 191 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात 972 शाळांमध्ये 17 हजार 57 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. या प्रवेशासाठी आतापर्यंत सर्वाधिक 38 हजार 609 पालकांनी अर्जांची नोंदणी केली. नागपूरमध्ये 680 शाळांमध्ये 6 हजार 797 प्रवेशाच्या जागा दाखविल्या आहेत. या जागांसाठी 20 हजार 595 अर्ज दाखल झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यात 669 शाळांमध्ये 12 हजार 915 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी 11 हजार 173 अर्ज दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गमध्ये सर्वांत कमी 51 शाळांमध्ये 347 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या असून यासाठी 113 अर्ज दाखल झाले. दरम्यान, पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.