पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये 1 ऑगस्ट 2022 पासून उपचाराकरिता शासकीय दर लागू केले. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नामध्ये एकाच महिन्यात तब्बल 45 लाख 38 हजार 404 रुपयांची वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात वैद्यकिय विभागाने महापालिकेच्या कोषागरात एक कोटी 24 लाख 40 हजार 621 रुपयांचा भरणा केला.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये पूर्वी पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या आणि ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळे शिधापत्रिका आहे अशा सर्वांवर मोफत उपचार केले जात होते. तसेच महापालिकेतील उपचाराचा दर शासकीय रुग्णालयापेक्षा कमी होता.
महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू केल्यानंतर माजी आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेची आठ रुग्णालये आणि सर्व दवाखान्यात शासकीय दर आकारण्याचा निर्णय घेतला. 1 ऑगस्ट 2022 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाइक आणि महापालिकेचे कर्मचारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तसेच राजकीय आणि सामाजिक संघटनांनी दरवाढीचा विरोधही केला मात्र प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
महापालिकेने शासकीय दर लागू करण्यापूर्वी जुलै 2022 मध्ये वैद्यकीय विभागाकडून 79 लाख दोन हजार 217 रुपयांचा भरणा केला. मात्र शासकीय दर लागू केल्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्यामध्ये 45 लाख 38 हजार 404 रुपयांची वाढ झाली.