प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 15 -जुन्नर तालुक्यात आंबेगव्हाण हे स्थळ बिबट सफारीसाठी अनुकूल असून, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. तसेच साडेसहाशे हेक्टर क्षेत्रांपैकी शंभर ते दीडशे हेक्टर क्षेत्रावर आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प साकारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनुपकुमार यादव, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सचिव (सुधारणा) शैला ए. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मौजे वढू-तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ’ करण्याला शिंदे यांनी या बैठकीत अनुमती दिली. वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समाधीस्थळ विकासाच्या विविध मागण्यांचे त्यांना निवेदन दिले होते. ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त निर्णय घेतला.
खानापूर येथील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रक्रिया उद्योग कार्यन्वित करण्यासाठी विशेष योजना तयार केल्यास हजारो कुटुंबीयांना रोजगार मिळेल, असे सांगून हिरडा या औषधी वनस्पतीचे उत्पादन करणाऱ्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा सहकारी उत्पादक संस्थेचे थकीत कर्ज भरण्यासाठी 2 कोटी एवढी रक्कम विशेष बाब म्हणून देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जुन्नर पूर येथील कुकडेश्वर मंदिराच्या संरचनेचे परीक्षण करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.