गणेश आंग्रे
पुणे -राज्यात महसूल अधिकाऱ्यांकडे एकूण 5 लाख 11 हजार 567 इतके दावे दाखल झाले असून त्यातील 3 लाख 70 हजार 584 दावे निकाली काढले आहेत. तर, 1 लाख 40 हजार 985 इतके दावे अजूनही प्रलंबित आहेत.
तर, पुणे जिल्ह्यात 22 हजार 168 इतके महसूलचे दावे प्रलंबित आहेत. जमीन दाव्यांची वाढती संख्या तसेच महसूल अधिकाऱ्यांकडे असलेली इतरही कामे यामुळे दावे प्रलंबित राहत असल्याचे सांगण्यात येते.
जमिनींना आलेला सोन्याचा भाव, हद्दिवरून असलेले वाद, सातबारा उताऱ्यामधील चुका आदी कारणांमुळे महसूल अधिकाऱ्यांकडे जमिनींच्या दाव्यांची संख्या वाढत आहे. जमिनीचा वाद, वारस नोंद, सातबाऱ्यावर नाव नोंदणी, इतर हक्कातील नाव कमी करणे, कुळ कायदा नोंद,
फेरफार रद्द करणे, जमिनीवरील शासकीय बोजा रद्द करणे, अशा अनेक प्रकरणांसाठी मंडल अधिकारी, नायब तहसिलदार, तहसिलदार, प्रातांधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, अप्पर विभागीय आयुक्त आणि महसूल सचिव यांच्याकडे दाद मागितली जाते.
महसूल अधिकाऱ्यांकडे सुनावणीच्या कामकाजाबरोबरच इतर प्रशासकीय कामे, दौरे, बैठका आदी कामे असतात. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या काळात दोन-तीन महिने हे निवडणुकीच्या कामकाजासाठी जातात.
त्यामुळे या काळात सुनावणी होत नाही. त्यामुळे दाव्यांच्या सुनावणीसाठी आठवड्यातील दोन ते तीन दिवसच मिळतात. यामुळे दाव्यांना पुढीच तारीख दिली जाते. या सर्व कारणांमुळे दावे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, करोनाच्या संसर्गाची यात आणखी भर पडली असल्याचे दिसत आहे.
पुणे जिल्ह्यात 28 हजार 317 दावे निकाली
राज्यात सहा विभाग आणि 36 जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत एकूण 669 कार्यालयांमध्ये महसूल दाव्यांची सुनावणी घेण्यात येते. या सर्व कार्यालयांमध्ये मिळून 1 लाख 40 हजार इतके दावे प्रलंबित आहेत. तर, पुणे जिल्ह्यातील 31 महसूल कार्यालयांमध्ये एकून 50 हजार 485 दावे दाखल झाले होते. यातील 28 हजार 317 निकाली काढले.