पुणे -बलात्काराच्या गुन्ह्यांत अनेकदा फास्ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी केली जाते. मात्र, त्याचा किती उपयोग होतो, हा प्रश्नच आहे. त्याऐवजी आरोपींना कठोर आणि लवकर शिक्षा मिळावी, यासाठी महिला अत्याचाराचे निवडक गुन्हे वूमन ऍट्रॉसिटी’ म्हणून दाखल करून घ्यावेत. त्यासाठी कायद्यात तरतूद करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी केली.
रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीला मदतीच्या बहाण्याने बाहेर नेऊन तिच्यावर 13 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, 13 जणांना अटकही केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाघ यांनी बुधवारी दुपारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ऍट्रॉसिटीमुळे आरोपींना जामीन मिळण्यापासून मुदतीत निकाल लावण्यापर्यंतची एक चौकट आखली जाईल. त्यातूनच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांना चाप बसेल, अशी शक्यताही वाघ यांनी व्यक्त केली.
संजय राठोड प्रकरण पोलिसांना तडीस न्यायचे नाही
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने पावले उचलत दोन दिवसात सर्व आरोपींनी अटक केली. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आहे. मात्र, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दित महमंदवाडी येथे एका तरुणीने आत्महत्या केली होती. तत्कालिन मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आहे.
या प्रकरणात पुणे पोलिसांनी आता सारखीच तत्परता दाखवली असती, तर काय झाले असते, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. दरम्यान, पुणे पोलिसांना ते प्रकरणी तडीस न्यायचेच नव्हते. त्यामुळेच अजूनही त्यात गुन्हा दाखल झालेला नाही, असा आरोपही वाघ यांनी केला.
लोणी काळभोरचा व्हिडीओ तुकड्यात का दाखवता?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याने लोणी काळभोर येथील महिला सरपंचाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणात आणखी एक व्हिडीओ समोर आला. त्यामध्ये सरपंच महिलेने कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे दिसून येते. त्याबाबत वाघ यांना विचारले असता त्या म्हणाल्या, हे व्हिडीओ तुकड्या तुकड्यात का दाखवले जात आहे.
खरे खोटे करायचे असेल, तर पूर्ण व्हिडीओ लावा. त्या कार्यकर्त्याने महिलेच्या अंगावर हात उचलला. त्यावर महिलेने गप्प का बसावे. तिने त्याला झोडून काढले पाहिजे होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अशा घटनांना थारा देणार नाहीत. दरम्यान, या घटनेनंतर कदमवाक वस्ती येथील लसीकरण थांबवले आहे. ते सुरू करण्याची मागणीही वाघ यांनी केली.