नवी दिल्ली – आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल 1.31 लाख कोटी रुपयाचे जीएसटी संकलन झाले आहे. जीएसटी अंमलात आल्यापासून दुसऱ्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर संकलन झाले आहे.
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, गेल्या पाच महिन्यापासून जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होत आहे. जीएसटी कर संकलन करण्याची पद्धत 1जुलै 2017 पासून लागू करण्यात आली आहे. यामध्ये सर्व अप्रत्यक्ष कराचे एकीकरण करण्यात आले आहे.
सुरुवातीपासून यासंदर्भात व्यापारी आणि उद्योगाच्या सूचनांच्या आधारावर या यंत्रणेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. त्यामुळे जीएसटी कर संकलन वाढत आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या तक्रारी कमी होत आहेत असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
जीएसटी संकलनासाठी जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने संकलन होण्यास मदत मिळत आहे.