“वाय-फाय’चे विस्तृत जाळे; स्मार्ट पार्किंगसाठी सर्वेक्षण पूर्ण
पिंपरी – स्मार्ट सिटी योजनेतंर्गत शहरामध्ये राबविण्यात येणाऱ्या पॅन सिटी उपक्रमात शहरात सद्य:स्थितीत 190 किलोमीटर अंतरात ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली आहे. “सायकल शेअरिंग’ हा प्रकल्प पिंपळेगुरव-पिंपळे सौदागर भागात “पीपीपी’ तत्त्वावर सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून 34 स्टेशनवर सुमारे 500 सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत.
शहरात वाय-फायचे विस्तृत जाळे टाकण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. एकूण 270 ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. स्मार्ट पार्किंगसाठी शहरात सर्वेक्षण सुरू आहे. तसेच, सीसीटीव्ही यंत्रणेसाठी पोलीस आयुक्तालयामार्फत ठिकाणे व संख्या निश्चित केलेली आहे. स्मार्ट सिटी योजनेत 30 डिसेंबर 2016 रोजी पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महापालिकेकडून तयार केलेल्या स्मार्ट सिटी अहवालामध्ये प्रामुख्याने विभागनिहाय विकास (एरिया बेस डेव्हलपमेंट) आणि पॅन सिटी सोल्युशन असे दोन घटक आहेत. एकूण 1 हजार 149 कोटी इतक्या रकमेच्या प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यापैकी 593 कोटी 67 लाख इतक्या रकमेच्या प्रकल्पांचा समावेश एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत केलेला आहे. पॅन सिटी सोल्युशन अंतर्गत 555 कोटी 53 लाख इतक्या रकमेच्या प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश आहे. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी “पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड’ या नावाने विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची 13 जुलै 2017 रोजी स्थापना केली. कंपनी सुरू होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे.