पुणे – राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर सहकारी निवडणुक प्राधिकरणाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्यातील 44 हजार 613 सहकारी संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यांत घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातील 3 हजार 213 सहकारी संस्थाचा समावेश असून या टप्प्यातील निवडणुका दि.15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.
डॉ. पाटील म्हणाले, प्राधिकरण गठीत झाल्यापासून 31 डिसेंबर 2020 अखेर अ, ब, क, ड या वर्गीकरणाच्या एकूण निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची संख्या 44 हजार 613 इतकी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या परंतु कोविडमुळे प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या 3 हजार 213 सहकारी संस्थांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 2 मध्ये 12 हजार 508 सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या टप्प्यातील निवडणुका 30 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात 4 हजार 301 सहकारी संस्थाचा समावेश असून या टप्प्यातील निवडणुका 31 मे 2021 अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत.
चौथ्या टप्प्यात मध्ये एप्रिल ते डिसेंबर 2020 अखेरच्या एकूण 14 हजार 591 सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यात येणार असून या टप्प्यातील निवडणुका 30 जून 2021 अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक 2 ते 4 बाबत निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांच्या मतदारांची प्रारूप मतदारयादी तयार करण्याकरीता अर्हता दिनांक हा टप्पानिहाय प्राधीकरणाकडून स्वतंत्र आदेशाने जाहीर करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.