विश्रांतवाडी- विश्रांतवाडी मुख्य चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत. येथे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर करण्यासाठी 2022-2023 च्या अंदाजपत्रकात 8 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे यांनी सांगितले.
प्रभाग क्र. 1, कळस-धानोरीचे नगरसेवक अनिल टिंगरे म्हणाले, “हा उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर व्हावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. तत्कालिन आमदार जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सन 2018-2019 मध्ये वडगावशेरी मतदारसंघात मान्य केलेल्या एकूण 6 उड्डाणपुलांमध्ये विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाचा समावेश होता. दरम्यान, करोनामुळे हे काम रखडलेले होते. आता उड्डाणपुलासह प्रभागातील विविध विकासकामांसाठी तरतूद उपलब्ध करण्याची मागणी आयुक्तांना केली होती. आता हे काम मार्गी लागणार आहे.’
अन्य रस्त्यांसाठीही निधी
प्रभागातील फाइन नाइन चौक ते धानोरी डीपी रस्त्यासाठी 90 लाख, धानोरी जकातनाका ते डी.वाय.पाटील कॉलेज रस्त्यासाठी 1 कोटी 25 लाख व 1 कोटी 37 लाख, धानोरी स.नं. 5 ते पोरवाल रोड रस्त्यासाठी 90 लाख, धानोरी स.नं 24 येथील डीपी रस्त्यासाठी 27 लाख 50 हजार निधी आयुक्तांनी मंजूर केल्याचे टिंगरे यांनी सांगितले.
वचनपूर्ती होत असल्याचे समाधान
“2017 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विश्रांतवाडी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविणार, धानोरी जकातनाका ते अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठापर्यंतचा रस्ता विकसित करण्याचे वचन दिले होते. आता यासाठी भरीव तरतूद उपलब्ध झाली आहे. हे काम झाल्यास पोरवाल रस्त्यावरचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडी संपेल. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर विश्रांतवाडी चौक कोंडीमुक्त होईल. नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याने समाधान वाटत आहे, असे नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे म्हणाले.