- दहा बुलेटसह 14 दुचाकी हस्तगत; गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी
पिंपरी – नाशिकमध्ये तब्बल 37 वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत वाहनचोरास पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून चोरीच्या दहा बुलेटसह 17 लाख 70 हजारांच्या 14 दुचाकी हस्तगत केल्या.
हेमंत राजेंद्र भदाने (वय 24, रा. भोरवाडा, सातपुर, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना एका वाहन चोराबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने 1 सप्टेंबर रोजी धावडेवस्ती, भोसरी येथून केटीएम मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. चौकशी दरम्यान त्याने पिंपरी चिंचवड व पुणे परिसरातून बुलेट, एफ झेड, के टी एम, पल्सर अशा महागड्या मोटार सायकली चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे या भागातील नागरीकांना कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकल्याचे समोर आले.
पोलिसांनी धुळे, बीड, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर मधून 10 बुलेट, 2 एफ झेड, 1 के.टी.एम व 1 पल्सर अशा 17 लाख 70 हजार रुपये किमतीची एकूण 14 दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, वाकड, एमआयडीसी भोसरी, चाकण येथील सहा, पुण्यातील चार आणि नाशिक जिल्ह्यातील दोन असे एकूण 12 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी कोणत्याही वाहनाने शहरात यायचा. पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी हेरून चोरायचा. त्यानंतर ती विकण्यासाठी सोशल मीडियावर वाहन विक्री करण्याची जाहिरात द्यायची. दुचाकी विकल्यानंतर सर्व मेसेज डिलीट करून टाकायचे अशा प्रकारे हा चोरटा वाहनचोरी करत होता. वाहन विक्रीत मदत करणाऱ्या योगेश सुनील भामरे, वय 24, रा. धुळे यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
2015 सालापासून तो वाहनचोर करत आहे. त्याने लॉकडाऊनच्या कालावधीत आपला मोर्चा पुण्याकडे वळवला. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, बाळु कोकाटे, अमित गायकवाड, नितीन खेसे, गणेश सावंत, विजय मोरे, प्रमोद गर्जे, मारूती जायभाये, विशाल भोईर, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.
पाच मिनिटांत वाहनचोरी
आरोपी भदाने अवघ्या पाच मिनिटांमध्ये दुचाकीचे हॅन्डल लॉक रॉडच्या सहाय्याने तोडायचा. वायर एकमेकांना जोडून दुचाकी सुरू करायचा. चोरलेली दुचाकी तो त्वरीत शहराबाहेर नेत असे.