रोहन मुजूमदार
पुणे – राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र नांदत असणाऱ्या शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर ‘बेबनाव’ आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आजी-माजी खासदारांचे समर्थकांमध्ये ‘सोशल वॉर’ सुरू झाले आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे वरिष्ठ काही भूमिका घेणार की हा वाद आणखी चिघळत जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
लोकसभा 2019च्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा खासदारकीचा चौकार अडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘खेळी’ खेळत शिवसैनिक असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना फोडून त्यांच्या हाती ‘घड्याळ’ बांधले अन् थेट खासदारकीच्या आखाड्यात उरवत त्यांच्या पाठिशी पूर्ण ताकदही पणाला लावली.
पहिल्याच डावात डॉ. कोल्हे यांनी आढळरावांना चितपट केले. तेव्हापासून महाविकास आघाडी स्थापन करेपर्यंत या दोघांमध्ये ‘शाब्दिक द्वंद’ रंगले होते. महाविकास आघाडीत तीनही पक्ष एकत्र असल्याने किंवा वरिष्ठांच्या सूचनेमुळे हे दोघे व त्यांचे समर्थक ‘गप्प’ होते; मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून ऐन करोना फोफावत असतानाच समर्थकांमध्ये सोशल ‘वॉर’ रंगल्याने ‘जनता वाऱ्यावर अन् आजी-माजी लोकप्रतिनिधी पत सांभाळ्यात आघाडीवर असल्याची खमंग चर्चा लोकसभा मतदारसंघात रंगली आहे.
- शिवसेनेच्या व्यंगचित्राने उडवली खिल्ली
शिरूर मतदारसंघ व परिसरात करोनाचा कहर सुरू असताना खासदार कुठे गायब आहेत, असा सवाल शिवसेनेने एका व्यंगचित्राद्वारे उपस्थित केला आहे. या चित्रात खासदार पीएला विचारत आहे की, आपली शुटींगची पुढची तारीख कधी? त्यावर पीए म्हणतो पण साहेब आपल्या मतदारसंघात करोनाबाधितांची संख्या खूपच वाढत आहे. त्यावर खासदार म्हणतात अरे येडा की खुळा. तुला राजकारणात कळतं का? दोन-चार पत्रे खरडायची त्याची बातमी होते. फेसबुक लाइव्ह करून मेसेज टाकले की झाले. अजून काय करायचे लोकासाठी? जा रायटरला पाठव, डायलॉग पाठ करायचेत. इथे मालिका खोळंबल्यात. या व्यंगचित्राने वादाल जरी तोंड फोडले असले तरी हीच वस्तूस्थिती असल्याचे शिवसैनिक व मतदारसंघातील अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.
- राष्ट्रवादीकडून सडेतोड उत्तर
इथल्या खासदारांना जे 15 वर्षांत जमले नाही, ते डॉ. कोल्हे यांनी करून दाखवले आहे. मतदारसंघातील प्रश्न अभ्यासपूर्ण संसदेत मांडून सोडविल्यामुळेच त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे पराभवाने पछाडलेल्या विरोधकांनी आता बदनामीची मोहीम हाती घेतली आहे. पण डॉ. कोल्हे यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देत ही पोस्टही व्हायरल केली आहे.
- खेड-जुन्नरमध्ये तीव्रता अधिक
शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड व जुन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद सारखीच असल्याने दोन्ही पक्ष एकमेकांवर ‘कुरघोडी’ करण्याची संधी सोडत नाही. जुन्नरमध्ये प्रत्यक्ष नाही; पण अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अतुल बेनके व शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यात धुसफूस सुरूच असते. तर खेडमध्ये आधी तहसीलदार व नंतर भामा आसखेड आंदोलनावरून आमदार दिलीप मोहिते पाटील व शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्या कलगीतुरा रंगला होता.