उमेदवार पाटील घराण्यातीलच असावा; कार्यकर्त्यांची मागणी

रेडा – बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्यातील असावा, अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली. यावेळी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाटील यांच्या कुटुंबीयांना सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.

बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक कॉंग्रेसच्या सदस्या रत्नप्रभादेवी पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहाजीनगर येथे रविवारी (दि.2) झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात करण्यात आली.

बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक (दि.23) जून रोजी होत आहे. कॉंग्रेसचा उमेदवार कोण असावा, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी रेटून धरली. यावेळी विद्यमान सदस्याचे निधन झाल्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकींमध्ये इतर पक्ष हे उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करतात, अशी राजकारणातील परंपरा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व सर्वच पक्षांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन इंदापूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड.कृष्णाजी यादव, माजी सभापती प्रशांत पाटील व विलासराव वाघमोडे, सुरेश मेहेर, डॉ. लक्ष्मण आसबे, प्रतापराव पाटील, उमेश सूर्यवंशी, तानाजी नाईक आदी पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना उमेदवार निवडीचे अधिकार दिले. पाटील यांच्या कुटुंबातील उमेदवार असावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकमताने केली. पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या संचालिका व शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त अंकिता हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री हर्षवर्धन पाटील व चित्ररेखा राजेंद्र कोरटकर, वकिलवस्ती अशी 3 नावे कार्यकर्त्यांनी सुचविली. दरम्यान, मेळाव्यास मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असे नमूद केले. तालुकाध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव यांनी आभार मानले.

हर्षवर्धन पाटील भाषणावेळी भावनिक
हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे बावडा-लाखेवाडीची पोटनिवडणूक होत आहे. रत्नप्रभादेवी पाटील ऊर्फ भाभींच्या आठवणींना सर्व वक्‍त्यांनी उजाळा दिल्याने मेळाव्यातील वातावरण भावनिक बनले होते. मेळाव्याच्या शेवटी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असताना मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या आठवणींनी हर्षवर्धन पाटील हे भावनावश झाले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. शब्दही बोलता येईना. त्यामुळे पाटील यांना भाषण पूर्ण करता आले नाही. यावेळी शांतता पसरली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.