- आकुर्डीत भरदिवसा घडला प्रकार
- दीड वर्षांपूर्वी भावाचाही झाला होता खून
पिंपरी – शहरात दहशत माजवणाऱ्या रावण टोळीचा प्रमुख कुख्यात गुंड अनिकेत जाधव याच्या भावाचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. 17) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आकुर्डी येथील पोस्ट ऑफिस समोर घडली. अनिकेत जाधव याचाही 20 नोव्हेंबर 2017 मध्ये आकुर्डीत खून झाला होता.
अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (वय 25, रा. रावेत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील पोस्ट ऑफिस समोर एक गॅरेज आहे. मंगळवारी दुपारी सोन्या त्याच्या तीन ते चार मित्रांसोबत दारु पित बसला होता. दरम्यान, दारू पिताना त्यांच्यामध्ये भांडण झाले. यावेळी चिडलेल्या आरोपींनी गॅरेज मधील साहित्याने सोन्याच्या डोक्यात वार केले. सोन्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी सोन्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
सोन्या हा देखील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोन्या हा रावण टोळीचा प्रमुख कुख्यात गुंड अनिकेत जाधव याचा भाऊ होता. मात्र हा प्रकार टोळीयुद्धाचा प्रकार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील आरोपींची नावे पोलिसांना समजली असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.