कोपरगाव: शहरातील मध्यवस्तीत असलेल्या संभाजी पुतळ्याजवळ रमेश मोरे व्यापारी संकुलातील कोलगट एजन्सीचे स्टॉकिस्ट प्रवीण शोभाचंद कोठारी यांच्यावर सात ते आठ आरोपींनी गावठी पिस्तूलचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे.
व्यापाऱ्यांवर पिस्तूल रोखून लूटमार करण्याच्या या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी व्यापारी प्रवीण कोठारी हे कोलगेटचे सुपर स्टॉकिस्ट असल्यामुळे त्यांचे खेडे गावांमध्ये व इतर तालुक्यांमध्ये सुद्धा मार्केटिंगचे काम आहे. संध्याकाळी हिशोब घेण्याच्या वेळी प्रवीण व इतर कर्मचारी कार्यालयात बसले असताना अचानक सात-आठ आरोपींनी दुकानावर हल्लाबोल केला.
सदर घटनेमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यानुसार सहा ते सात आरोपी तोंडाला रुमाल बांधलेले दिसून आले आहे.