सातारा -कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ताब्यातील 60 एकर जागा नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा सातारा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. येत्या सहा महिन्यांत मेडिकल कॉलेजच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. सातारच्या मेडिकल कॉलेजच्या अनुषंगाने सोमवारी रात्री कृष्णानगरच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, धोम कालवे विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. गायकवाड, जिहे कटापूर विभागाचे कार्यकारी अभियंता निकम, लघु पाटबंधारे विभागाचे हिरे यांची उपस्थिती होती.
याबाबत जयंत पाटील म्हणाले, “सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे महामंडळाच्या ताब्यातील 60 एकर जागा देण्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. आता हा प्रस्ताव नियामक मंडळापुढे ठेवला जाईल. तो मंजूर होऊन हस्तांतराची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जाईल. सातारा शहराजवळ एवढी प्रशस्त जागा मेडिकल कॉलेजला उपलब्ध होत आहे ही समाधानाची बाब आहे.
मेडिकल कॉलेजच्या मार्गातील अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत कॉलेजच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होईल.’ यापूर्वीच्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने मेडिकल कॉलेजची मुहर्तमेढ रोवली असून गेल्या पाच वर्षात त्यावर कोणतीही हालचाल झाली नव्हती. आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागत आहे.
पुढील प्लॅनिंगच्यादृष्टीने जिल्हाधिकारी स्वत: यामध्ये लक्ष घालतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासन कोणावरही अन्याय करणार नाही, ज्यांचे अतिक्रमण असेल त्यांनी काढावे, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांनी जयंत पाटील यांना तांत्रिक माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला
सातारा आणि बारामती येथील मेडिकल कॉलेजला एकाच वेळी मान्यता मिळाली होती. बारामतीचे कॉलेज सुरू झाले मात्र सातारच्या कॉलजच्या जागेचा प्रश्न मिटत नसल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि.27 जून रोजी सातारा दौऱ्यावर असताना व्यक्त केली होती. त्यानंतर दोनच दिवसात हा प्रश्न मार्गी लागल्याने अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव
मेडिकल कॉलेजसाठी जागा हस्तांतरण करण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा झाला. यावेळी जयंत पाटील, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांनी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि अन्य अधिकारी, पदाधिकाऱ्यांनाही पेढे भरवण्यात आले.