वाई – वाई तालुक्यात आजपर्यंत ग्रामीण भागात गावांत दररोज करोनाचा शिरकाव होत होता. त्यावेळी आपल्याला काही होणारच नाही, अशा अविर्भावात वावरणाऱ्या वाईकरांची सोमवारी रात्री झोपच उडाली. वाई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या किसन वीर चौक, धर्मपुरी, ब्राम्हणशाहीत व्यापाऱ्यांनाच करोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे सर्वजण मुंबई- पुण्याहून आपल्या व्यवसायासाच्या माल खरेदीसाठी गेले असल्याने करोनाचा संसर्ग झाला आहे. वाई तालुक्यातील काही गावांत दररोज नवीन करोनाबाधित सापडत असल्याने तालुक्याची चिंता वाढत चालली आहे. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार वाई तालुक्याला दिलासा मिळाला असला तरीही शहरात मध्यवर्ती ठिकाणी दोन रुग्ण सापडल्याने वाईकरांची झोपच उडाली आहे.
आतापर्यंत वाई शहराच्या हाकेच्या अंतरावर करोना संकट आ वासून उभे होते. सोमवारी रात्री शहरातच करोनाचा शिरकाव झाल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी वाई शहरात येऊन गर्दी करतात.
याकडे प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. त्यामुळे वाहनांसह चालणारांचीही प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे.
सोशल डिस्टन्सिंग नावाची काही गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. वाई शहराच्या नाक्यावर करोना तपासणी होणे गरजेचे असताना तालुका वैद्यकीय अधिकारी अजूनही या बाबत अनभिज्ञ दिसत आहेत.
मुंबईमध्ये नोकरीनिमित्त गेलेल्या नागरिकांच्या घरी येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. त्यापैकी काही व्यक्ती पॉझिटीव्ह असल्याने वाई तालुक्यात दररोज नवीन गावांत करोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. आरोग्य विभागाने एसटी स्टॅंडवरच तपासणी पथक नेमावे अशी मागणी करण्यात येत आहे. मुंबई- पुणे या इतर शहरांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. तसे न झाल्याने वाई तालुक्यात करोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतच चालला आहे.
वाई तालुक्यातील रुग्णसंख्या 81
वाई तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या 81 झाली आहे. त्यातील 65 रुग्ण बरे झाले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 275 जण “हाय रिस्क’मध्ये आहेत. एकच करोना केअर सेंटर आहे. शहरात धर्मपुरीत 35 वर्षीय पुरुष, ब्राम्हणशाहीत 68 वर्षीय महिला निष्पन्न दोन दिवसांपूर्वी किसन वीर चौकातील व्यापारी पॉझिटीव्ह आढळल्याने वाई शहरातील व्यापारी भीतीच्या छायेत आहेत. संबंधित कुटुंबाना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.