सातारा/पुसेगाव, दि.1 (प्रतिनिधी)-
खटाव तालुक्यातील नागनाथवाडी गावच्या हद्दीत नेर तलाव क्षेत्रात गेली अनेक दिवस अनधिकृतपणे माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडून शुक्रवारी (दि. 1) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यात दोन पोकलेन मशिनसह मुरूम वाहतूक करणारे सात टीपर जप्त करण्यात आले.
अनधिकृत माती उत्खनन आणि वाहतुकीवर तहसीलदारांनी कारवाई केल्याने नेर तलाव परिसरात कार्यरत असलेल्या फलटण तालुक्यातील हणमंत तात्याबा कुंभार, विकास सर्जेराव शिंदे, दत्तात्रय कुंडलिक कुंभार, किरण तुकाराम झणझणे, प्रशांत दत्तात्रय भुजबळ, संदीप विलास कुंभार या माफियांना दणका दिल्याने भराव माफियांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील नेर तलाव लाभक्षेत्रात नागनाथवाडी परिसरात फलटण तालुक्यातील गाळ माफियांनी उच्छाद घातल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांना मिळाली होती. या ठिकाणावरून नेलेला गाळ फलटण तालुक्यातील छोट्या मोठ्या प्रकल्पांमध्ये तसेच या गाळाचा शेतीसाठी भराव म्हणून वापर केला जात आहे. या परिसरातील माती आणि मुरूमाचे अनधिकृत उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवून वाहतूक केल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत.
शुक्रवारी तहसीलदारांनी नेर तलाव लाभक्षेत्रातील नागनाथवाडीत छापा टाकला असता सुमारे एक किलोमीटर इतक्या अंतरावर अनधिकृतपणे मातीचे खोदकाम केल्याचे आढळून आले. कारवाई दरम्यान तहसीलदारांनी खोदकाम करणारे दोन पोकलेन व उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक करीत असलेले सात टीपर जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर तहसीलदारांनी ही जप्त करण्यात आलेली वाहने पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात दिली असून वाहन मालकांना लवकर दंडाची नोटीस दिली जाणार आहे. ही कारवाई जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी अशोक साबळे, नेरचे तलाठी अमोल जाधव, ललगुणचे तलाठी अमित हिरडे यांनी केली