पालिका आयुक्तांचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश
पुणे : प्रशासकीय कामकाजासाठी महापालिकेची शहरात 15 क्षेत्रीय कार्यालये सुरू आहेत. यांचे कामकाज पाहण्यासाठी सहायक आयुक्त नेमण्यात आले असून, ते मिनी आयुक्त म्हणूनही ओळखले जातात. या अधिकाऱ्यांना कामकाज वेळेत तसेच गतिमान व्हावे, म्हणून आयुक्तांचे अनेक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, हे अधिकार नेमके कोणते, याचे कोणतीही एकत्रित माहिती आयुक्त कार्यालय तसेच इतर कोणत्याही कार्यालयाकडे नाही. त्यामुळे आपल्याच पदाचे प्रशासकीय सेवेसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार कोणते, ही माहिती मागवण्याची वेळ आयुक्तांवर आली आहे.
आयुक्तांच्या सूचनेनुसार, सामान्य प्रशासन विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना हे आदेश पाठवले असून, दोन दिवसांत आयुक्तांनी प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागवली आहे.
सहायक आयुक्तांच्या अख्त्यारित तीन ते चार प्रभाग येतात. त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्यासह आयुक्तांचे इतरही काही अधिकार आहेत. केवळ आयुक्तांच्या मान्यतेसाठी सर्वसामान्यांची तसेच विकासात्मक कामे थांबू नयेत, या उद्देशाने हे अधिकार मागणी केल्यानुसार दिले आहेत. मात्र, अधिकारांची स्वतंत्र नोंद कोणत्याही विभागाने ठेवलेली नाही. प्रत्यक्षात प्रत्येक विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी प्रशासन अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील आहे. मात्र, आयुक्त कार्यालय अथवा इतर ज्या विभागांच्या मागणीनुसार हे अधिकार दिलेले आहेत. त्या विभागांकडून याची कोणतीही एकत्रित माहिती ठेवण्यात आलेली नाही.
नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी प्रशासकीय आढावा घेताना, क्षेत्रीय कार्यालयांना तसेच विभाग प्रमुखांना आयुक्तांचे कोणते अधिकार देण्यात आले आहेत, याची माहिती घेतली. मात्र, कोणत्याही विभागास ती देता आली नाही. त्यामुळे आयुक्तांनी ही माहिती संकलित करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागास दिल्या आहेत. त्यानुसार या विभागाकडून 3 दिवसांत ही माहिती सादर करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना दिल्या आहेत. मात्र, या निमित्ताने कामकाजात महापालिका प्रशासनात असलेला विस्कळीतपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.