पिंपरी – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून महिलेला पिस्तूल दाखवून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री पावणेअकराच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथे घडली.
ज्ञानराज लांडगे (वय अंदाजे 27, रा. गवळी माथा, भोसरी), कृष्णा शिंदे (वय 30, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), लोकेश कुळे (वय 26, रा. शीतलबाग, भोसरी) आणि त्यांचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. श्वेता गुरुदत्त पांडे (वय 20, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. 4) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पती आणि आरोपींचे पूर्ववैमनस्य आहे.
सोमवारी रात्री फिर्यादी यांच्या घरी आरोपी आले. आरोपी ज्ञानेश्वर हा पिस्तूल घेऊन येत असल्याचे पाहिल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करून दरवाजावर लाथा मारल्या. जर दरवाजा उघडला नाही, तर गोळ्या घालून ठार मारेल, अशी धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.