पुणे : समाज, धर्म व राष्ट्राची सांस्कृतिक पातळी ही त्या भागातील स्त्रियांच्या स्थानावर अवलंबून असते. ज्या समाजात स्त्री ला स्थान व मान असेल, त्यानुसार तेथील सांस्कृतिक पातळी ठरते. स्त्री शक्ती हे बल असून तिचा गौरव ही अभिव्यक्ती आहे. ज्यांनी अशी अभिव्यक्ती घडविली, त्या स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला मोठे स्थान असून ज्ञान, शरीर व संपत्ती ही तिन्ही बले एकवटतात, ती स्त्री शक्ती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून भरारी घेणा-या महिलांचे कार्य समाजासमोर यावे, याउद्देशाने सुरु केलेल्या स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मृणाली रासने यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कला, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील महिलांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं.मनिषा साठे, शिक्षणक्षेत्रात डॉ.विद्या येरवडेकर, वैद्यकीय क्षेत्रात डॉ.जयश्री तोडकर, उद्योजिका झेलम चौबळ यांना यावर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फळांची परडी, शाल, सन्मानचिन्ह, पैठणी साडी, हलव्याचा हार असे सन्मानाचे स्वरूप होते.
रासने म्हणाले, समाजातील विविध क्षेत्रात ठसा निर्माण करणा-या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, असे म्हटले जाते. मात्र स्त्रियांनी कोणीही मागे नसतात, यश संपादन केले आहे. इतर महिलांनी आदर्श घ्यावा, अशा अनेक स्त्रिया आपल्या समाजात आहे. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आणून आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत. डॉ.प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.