पुणे : शहरात दिवसें दिवस करोनाचे नवीन बाधित रूग्ण वाढत असताना शहर पूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठयावर आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्स पाळावे तसेच रस्त्यावर थुंकू नये अशा सूचना वारंवार केल्या जात आहेत. मात्र, या सूचनांना हरताळ फासणारे बेशिस्त पुणेकरांनी मागील दोन महिन्यात तब्बल 3 कोटी साडेतीन लाख रूपयांचा दंड भरला आहे. या रकमेची सरासरी काढल्यास हे बेशिस्त पुणेकर दिवसाला तब्बल 5 लाख 5 हजारांचा दंड भरत असल्याचे महापालिका आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.
शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडयापासून करोना बाधितांची संख्या झपाटयाने वाढली असून हा आकडा दैनंदिन 5 हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे, करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी महापालिका आणि पोलिसांकडून प्रभावीपणे करण्यात येत आहे. त्याचाच, एक भाग म्हणून मास्क न वापरणाऱ्यांवर प्रत्येकी 500 रूपयांचा दंड आकारण्या येत असून सोशल डिस्टंन्स न पाळने, हॉटेल मध्ये सुरक्षा साधने नसल्यास महापालिकेकडून दंड आकारणी केली जाते. त्या अंतर्गत गेल्या दोन महिन्यात मास्क न वापरणाऱ्यां 56 हजार 605 जणांकडून तब्बल 2 कोटी 75 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यां 206 जणांकडून 2 लाख 82 हजार, तसेच नियम न पाळणाऱ्या हॉटेल, मॉल्स तसेच दुकानदारांकडून 26 लाख 71 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.