- विक्री 70 टक्क्यांनी घटली
- मंदिर व धार्मिक कार्यंक्रम बंद
पिंपरी – शहरातील मंदिर व देवस्थानांच्या वतीने नियोजित सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून अनेक लग्न समारंभ तसेच मुंजीचे कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे फूलविक्रीवरही परिणाम झाला असून फूलबाजार ठप्प झाल्याचे चित्र आहे.
शहरातील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिर, प्राचीन शिवालय धनेश्वर मंदिर, यासह विविध मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. लग्न समारंभ, ओटीभरण व मुंज यासारखे समारंभ तात्पुरते लांबणीवर टाकण्यात आले आहेत. त्यात फूल विक्रेत्यांकडे ग्राहकच फिरकत नसल्याने शहरातील फूलबाजार ठप्प झाला आहे.
मंदिर बंद व कार्यक्रम रद्द झाल्याने फूल व्यवसायास मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या तीन चार दिवसात विक्री तीस टक्क्यांपर्यत खाली घसरली आहे. ग्राहकच फिरकत नसल्यामुळे फूलव्यापार ठप्प आहे. सर्व व्यापारी स्वतःच्या खिशातील पैशांनी शेतकऱ्यांना जुनी देणी देत आहेत. शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांची देणी थांबवता येणार नाहीत. त्यामुळे त्यांची देणी देण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरीतील फुलविक्रेत्यांनी दिली.
आज व्यापाऱ्यांची बैठक
पुण्यातील गुलटेकडी मार्केट गुरुवारपासून बंद आहे. त्या अनुषंगाने पिंपरीतील फूल व्यापाऱ्यांची आज (गुरुवारी) सकाळी बैठक होणार आहे. त्यानंतर थोडाफार जो माल येईल तो विकला जाईल. या बैठकीत फूल बाजार तीन दिवसांसाठी बंद करण्यावर निर्णय घेण्यात येईल.
पिंपरीत 32 होलसेल व्यापारी आहेत आणि जवळपास दीड ते दोन हजाराहून अधिक फूल विक्रेते आहेत. याचा फटका सर्वांना बसला आहे. उद्यावर असलेले लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच मुंजीचा कार्यक्रम रद्द होत आहेत. ओटी भरणाची ऑर्डर नुकतीच कॅन्सल करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी अडचणीत आले असून ग्राहकच नसल्याने माल वाया जात आहे.
– गणेश आहेर, होलसेल व्यापारी, पिंपरी,