पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून सध्या सुरू असलेला पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्प आणि वाल्हेकरवाडी येथील गृहयोजनेची “महारेरा’कडे नोंदणी करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरूवारी प्राधिकरण सभेत मंजुरी देण्यात आली.
प्राधिकरणातर्फे पेठ क्रमांक 12 मध्ये 4 हजार 883 घरांचा गृहप्रकल्प साकारत आहे. स्पाइन रस्ता आणि टाटा मोटर्सजवळ असलेल्या या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 3 हजार 317 आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी 1 हजार 566 सदनिका उभारल्या जात आहेत. 9.34 हेक्टर क्षेत्रावर हे काम सुरू आहे. प्रकल्पातील ईडब्ल्यूएसमधील सदनिकांचे कार्पेट क्षेत्र 317.53 चौरस फूट तर, एलआयजीमधील सदनिकांचे क्षेत्र 637.86 चौरस फूट इतके असणार आहे.
पेठ क्रमांक 30 आणि 32 मध्ये वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या गृहप्रकल्पात 792 घरे उभारण्यात येणार आहे. एकूण 34 हजार चौरस मीटर क्षेत्रावर हा प्रकल्प आहे. त्यातील प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्र हे 27 हजार चौरस मीटर इतके आहे. प्रकल्पात 274 चौरस फुटाच्या 378 वन रूम किचन सदनिका आहेत. तर, 372 चौरस फुटाच्या 414 वन बीएचके सदनिका आहेत. दोन्ही गृहप्रकल्पात बाजारभावापेक्षा 50 टक्के कमी दराने सदनिका उपलब्ध करून देण्याचे प्राधिकरण प्रशासनाचे नियोजन आहे. वाल्हेकरवाडी गृहयोजनेची महारेराकडे नोंदणी झाल्यानंतर सोडत पद्धतीने प्रकल्पातील सदनिकांचे वाटप करण्याचे नियोजन आहे.
कायद्याचे बंधन
कोणत्याही विकसकाला निवासी, बिगरनिवासी अथवा एनए प्लॉटचा प्रकल्प पूर्णत्व दाखला घेण्याआधी विक्री करावयाची असेल तर त्यास त्या प्रकल्पाची नोंदणी महारेराकडे करणे आवश्यक आहे. त्यामध्ये 500 चौरस मीटरपेक्षा आधिक मोठा भूखंड अथवा आठपेक्षा आधिक सदनिका विक्रीस असणे हा निकष आहे. हा निकष पूर्ण करण्यासाठी तसेच कायद्याचे बंधन असल्याने महारेराकडे नोंदणी केली जाणार आहे.