पुणे -पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रा. लि. ने कर्ज थकवले असून ठेवीदारांनी सुवर्णभिशी योजनेतील ठेवी काढून घ्याव्यात, असा फसवा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित करणाऱ्या अज्ञाता व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रा. लि. चे जनसंपर्क अधिकारी नीलेश कोळपकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाता विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 18 सप्टेंबर रोजी हा आक्षेपार्ह फसवा मजकुर फिरला होता.
पु. ना. गाडगीळचे मालक सौरभ गाडगीळ यांनी डीएचएफएलसी या खासगी वित्तीय संस्थेचे कर्ज थकवले आहे. ठेवीदारांनी ठेवी काढून घ्याव्यात, असा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित करून बदनामी केली. या प्रकरणात अज्ञाता विरोधात कारवाईची मागणी कोळपकर यांनी तक्रारीत केली आहे. सायबर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. याविषयी पीएनजीचे वकील पुष्कर दुर्गे म्हणाले, सोशल मिडीयाद्वारे धांदात खोटे मेसेज पसरवून पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सला बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे. व्हॉट्स अपद्वारे ही पोस्ट प्रसारीत झाली होती. त्यानुसार याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलीस यामध्ये योग्य तपास करतील.