सध्या जगभर करोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिले जात आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना आठ तासांपेक्षा जास्त आणि केव्हाही काम करावे लागत असल्याने वैतागही वाढला आहे. त्यामुळे यातून पळवाटा शोधण्यासाठी लोक वेगवेगळ्या करामती करत असतात.
मेक्सिकोमधील संसद सदस्य असणाऱ्या महिलेने तर कमालच केली. झूम मीटींगच्या वेळी स्वतःची उपस्थिती दाखवण्यासाठी त्यांनी कॅमेऱ्यासमोर फोटो ठेवला होता. त्या मीटींगला उपस्थित होत्या मात्र काही वेळाने त्या उठून गेल्या. मात्र तरीही आपण मीटींगमध्ये आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी छायाचित्र ठेवले होते. मात्र त्या उठतानाच्या आणि त्यांच्या इतर हालचाली कॅमेऱ्याने टिपल्याने त्याची करामत पकडली गेली. व्हॅलेंटिना बात्रेस ग्वादेरमा असे या संसद सदस्य महिलेचे नाव आहे. त्या मेक्सिकोतील मोरेना पार्टीच्या नेत्या आहेत. तेथील मेक्सिको न्यूज डेलीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
मीटींगमधून त्यांना व्यवस्थितपणे बाहेर पडता आले नाही. त्या जागेवरून उठत असल्याचे दिसत आहे. वाईट म्हणजे त्या उठून गेल्यानंतर टेबलवरील काहीतरी उचलण्यासाठी लगेचच परत येतात तेव्हा त्यांचा हात दिसतो. त्या उठून गेल्यावर दिसत असणारे छायाचित्र पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनाही धक्का बसल्याचे आणि सगळ्यांचे मनोरंजन झाल्याचे नंतर दिसते.
स्थानिक डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन पक्षाचे जॉर्ज गेव्हिनो यांनी या प्रकाराची क्लिप ट्विटरवर शेअर केली आणि लिहिले आहे की, मला वाटले की, तुम्ही माझे बोलणे अतिशय एकाग्रतेने ऐकत आहात. पण ते तुमचे छायाचित्र आहे हे कळल्यावर माझा भ्रमनिरास झाला. सुमारे 63 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि शेकडो लोकांनी ग्वादेरमा यांच्यावर टीका करणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्या.
मात्र ग्वादेरमा यांनी यावर अतिशय संयत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात, असे करून मी कोणत्याही राजशिष्टाचाराचा भंग केलेला नाही. डिजिटल जगात कसे वावरायचे याचे मला ज्ञान नसल्याने माझ्याकडून चूक झाली. मला तांत्रिक मदत हवी होती त्यासाठी मी सेकंदभर थांबले. त्यावेळी समोर ठेवलेला फोटो दिसला. तुम्ही मीटींगचा सगळा व्हिडिओ पाहिला तर मी, अनेक हालचाली व माझ्या चेहऱ्यावरील हावभाव तुम्हांला दिसतील.
झूम मीटींगच्या वेळी गडबड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे महिन्यात ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी झूम कॉन्फरन्स मीटींग बोलवली होती त्यावेळी तेथील एक उद्योजक अनावधनाने नग्नावस्थेत अवतरले होते.
Diputada @valentinabtg: y yo pensando que usted le estaba poniendo mucha atención a mi discurso, cuando me di cuenta que esa mirada atenta era una fotografía. 🤯 pic.twitter.com/AqjsMD9HBo
— Jorge Gaviño (@jorgegavino) September 19, 2020