बीड/ मुंबई – पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावांडांतील वैर संपल्याची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात आहे. मात्र, दोघांमधील कौटुंबिक संबंध सुधारल्याचे दिसत असले तरी, राजकीय वैर अजूनही संपलेले नसल्याची प्रचिती येत आहे. माझे समर्थक मला 25 मतदारसंघातून उभे राहा म्हणतात. मात्र, मी माझ्याच मतदार संघातून निवडणूक लढविणार आहे, अशा अफवा पसवरू नका, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी या विषयावर गुरुवारी पडदा टाकला. त्या बीडमध्ये बोलत होत्या.
पंकजा यांनी जर खरोखरच परळीची जागा सोडली आणि पाथर्डीतून विधानसभा निवडणूक लढवली, तर वडिलांच्या पारंपरिक जागेवरून पळ काढल्याचा आरोप त्यांच्यावर होणार. या कारणामुळे पंकजा आपल्या वडिलांची पारंपारिक जागा सोडणार नसल्याचे समजते. त्यावरच गुरुवारी पंकजा यांनीच माध्यमांशी बोलताना शिक्कामोर्तब केले. ज्यामुळे पाथर्डी मतदार संघाच्या विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे यांचा जीव भांड्यात पडला.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मनोमिलनाच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून येत आहेत. माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच आहे, असे कौतुकाचे उद्गार पंकजांनी काढले. तर, पंकजा आणि माझ्यात सुईच्या टोकाऐवढेही वैर नाही, असे धनंजय यांनी म्हटले. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील नारळी सप्ताहानिमित्त दोन्ही भावंड बऱ्याच दिवसांनंतर एकाच व्यासपीठावर आल्याने हा धार्मिक कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.
त्यात पाथर्डी तालुक्यात पंकजांना माणनाऱ्या वंजारी समाजाची लोकसंख्या चांगली आहे. त्यामुळेच पंकजा परळीची जागा सोडून पाथर्डी-शेवगावतून विधानसभा निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू झाली. त्याला आज स्वतः पंकजांनी पूर्णविराम दिला.
राजकीय वारसा
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा धनंजय यांच्याकडून 13.69 टक्के मतांच्या फरकाने पराभव झाला. धनंजय यांना 54.45 टक्के म्हणजे 1,22,114 मते आणि पंकजा यांना 40.76 टक्के म्हणजे 91,413 मते मिळाली होती. परळीची जागा पंकजा यांचे वडील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कै. गोपीनाथ मुंडे यांची पारंपरिक सीट होती. पंकजा यांनी ही जागा सोडल्यास वडिलांचा राजकीय वारसा नीट न हाताळल्याचा आरोप त्यांच्यावर होणार आहे. त्यामुळेच त्या ही जागा सोडणार नसल्याचे समजते.
सिद्ध करण्याचे आव्हान
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यामुळे पंकजा मुंडे यांना परळीची जागा गमवावी लागली हे सर्वांना माहीत आहे. मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आले नसले तरी, राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे.’ अशा प्रकारचे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री असताना केले होते. पंकजा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राहू नयेत म्हणून भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने पडद्याआड राहून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना मदत केल्याची चर्चा तेव्हा होती. यामुळेच पंकजा यांच्यासमोर आता निवडणूक जिंकून स्वत:ला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे.