पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना विषाणूने बाधित रुग्णांची संख्या आठ वर पोहचली आहे. परदेशातून शहरात आलेल्या 161 नागरिकांना “होम क्वांरटाईन’ (स्वत:च्या घरात बंदिस्त) करण्यात आले आहे. तर महापालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात असलेल्या आयसोलेशन वॉर्डात 48 संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते. 48 संशयितपैकी सात संशयितांचे तपासणी अहवाल नॉर्मल आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.
महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयामध्ये आजर्पंयत 48 रुग्णांना दाखल केले आहेत. त्या संशयित रुग्णांच्या घश्यातील द्रावाचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पॉझिटिव्ह असलेल्या आठ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. तर 41 जणांच्या द्रावाचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यांना क्वांरटाईन करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर परदेशातून शहरात आलेल्या 161 नागरिकांना घरीच क्वांरटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित वैद्यकिय अधिकाऱ्यांना दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लक्षणे आढळलल्यास घरामध्ये वेगळ्या खोलीमध्ये राहण्याचे आवाहन वैद्यकिय विभागाने केले आहे.
रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनाही बाधा
पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने आढळलेल्या पाच जणांमध्ये थायलंडला जाऊन आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे. तर यापूर्वी शहरात आढळलेल्या तीन करोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाच्या संपर्कात आलेल्या स्थानिक कुटुंबांतील चौघांना देखील करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे.