- कोट्यवधींचे सल्ले : महापालिकेकडून नदी सुधार योजनेतही उधळपट्टी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम संथ गतीने सुरू आहे, असे असताना या प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आणखी एक सल्लागार नियुक्तकरण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने सल्लागार नेमून त्यांना पोसण्यातच धन्यता मानली जात आहे. या सल्लागारांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असूनही कामाचा दर्जा व कामे वेळेत न होणे, याबाबतच्या तक्रारी येतच असतात. तरीही पालिकेला “सल्लागारां’चा मोह सुटत नाही.
पवना नदीची पिंपरी चिंचवड शहरातील लांबी 24.4 किलोमीटर आहे तर इंद्रायणी शहरातून 20.6 किलोमीटर वाहते. या दोन नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुळा नदी शहरातून वाहते. मात्र, त्याचा सुधार पुणे महापालिका करणार असून, त्याचा खर्च पिंपरी महापालिका अदा करणार आहे.
पवना व इंद्रायणी या दोन नद्यांचा सुधार करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या कामासाठी अहमदाबाद, गुजरातच्या एचसीपी डिजाइन प्लॅनिंग ऍण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. याचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे. सर्व आवश्यक परवानग्या घेणे, आदी कामे ही एजन्सी करीत आहे. दोन वर्षांपासून हे काम सुरु असून अद्यापही ते पूर्ण झालेले नाही.
नदी सुधार प्रकल्प उभारणी व देखभालीसाठी एकूण 100 स्थळांची पाहणी करण्यात येणार आहे. कामाच्या मोबदल्यात महापालिका एचसीपी एजन्सीला देयकाच्या 25 टक्के रक्कम 5 समान टप्प्यामध्ये अदा करणार आहे. पवना नदीसाठी 2 कोटी 70 हजार आणि इंद्रायणी नदीसाठी 1 कोटी 78 लाख 40 हजार असे एकूण 3 कोटी 79 लाख 10 हजार रुपये शुल्क अदा केले जाणार आहे. त्यास स्थायी समितीने जून 2018 ला मंजुरी दिली आहे.
डीपीआर तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष देखभाल व दुरूस्ती कामासाठी युनिटी आयईवर्ल्ड या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यास स्थायी समितीने शुक्रवारी (दि.29) आयत्या वेळी मंजुरी दिली आहे. त्या एजन्सीला निविदा कामांच्या 1.25 टक्के शुल्क अदा केले जाणार आहे. ही रक्कम कोट्यवधीत आहे.