नवी दिल्ली – संघाला विमानातून थेट मैदानावरच उतरावे लागेल, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर टीका करणाऱ्या विराट कोहलीला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती दिली जाणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्याबरोबरच पूर्वी झालेल्या काही मालिकांमध्ये कोहलीवर ताण आला होता. त्यातच उपकर्णधार रोहित शर्माने काही सामन्यांतून विश्रांती घेतली होती. त्यामुळे कोहलीला विश्रांती मिळालेली नव्हती. आगामी मालिका तसेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी खेळाडूंना दुखापत होऊ नये व पुरेशी विश्रांती मिळावी हाच या मागचा हेतू आहे, असे संकेत मंडळाने दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेस येत्या 12 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. रोहित शर्मा दुखापतीने संघाबाहेर आहे. तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही, अशा परिस्थितीत कोहलीलाही विश्रांती देण्यात येणार असल्याने संघाचे नेतृत्व नव्या खेळाडूकडे सोपविण्यात येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिखर धवन पूर्ण तंदुरुस्त ठरला असल्याने तो या मालिकेसाठी संघात पुनरागमन करणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र सध्या भरात असलेला सलामीवीर लोकेश राहुलकडे नेतृत्व देण्यार असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी आपला संघ जाहीर केला आहे.
दक्षिण आफ्रिका संघ – कॉन्टन डिकॉक, थेंबा बवुमा, रेसी वॅनडेर डुसेन, फाफ डुप्लेसी, काइल वेरीन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन जॉन स्मट, अँडिल फुलुक्वायो, लुंगी एंजिडी, लुथो सिपामला, ब्युरेन हेंड्रिक्स, एनरिक नोकिया, जार्ज लिंडे आणि केशव महाराज.