बेल्हे – जुन्नर तालुक्यातील पहिल्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन राजुरी येथे जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवभोजन केंद्राअंतर्गत संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था, राजुरी संचलित संकल्प अन्नपूर्णा केंद्र या संस्थेमार्फत गुलामनबी शेख यांच्या पुढाकाराने शिवभोजन केंद्र गावात सुरू झाले आहे.
सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आपात्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या मजुरांना याचा लाभ होणार आहे. यावेळी तहसीलदार कोळेकर यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आहे.
पहिल्याच दिवशी 120 गोरगरीबांना व मजुरांना शिवभोजनाचा लाभ मिळाला. दररोज 11 ते 3 दुपारी वाजेपर्यंत जेवणाची वेळ असणार आहे. पहिले 3 महिने 5 रुपयांप्रमाणे थाळी मिळणार असून त्यानंतर 10 रुपयांना मिळणार आहे.
यावेळी बाळासाहेब औटी, झाकीर पटेल, माऊली शेळके, संजय गवळी, जीलानी पटेल उपस्थित होते. राजुरी गावात पहिली शिवभोजन थाळी सुरू झाल्याने सरपंच एम. डी. घंगाळे यांनी आभार मानले.