आज फेसबूकवरच्या एका फ्रेंडचा फोटो आणि त्याच्या जन्म तारखेचा आकडा असलेली नोट आणि त्याखाली सप्रेम भेट… आणि 453 नवी नोट असा उल्लेख होता. आजपर्यंत 453 लोकांना त्यांच्या जन्म तारखेच्या, लग्नाच्या तारखांच्या आकड्यांच्या नोटा सप्रेम भेट देणारा अवलिया! आश्चर्य वाटलं ना? असतात एकेकाला असे छंद! हे छंद खूप प्रकारचे असतात. आता ह्या नोटा कितीच्या आहेत ह्याचा विचारही व्यक्ती करत नाही. 5 रुपयांपासून 50, 100 कितीचीही नोट असते पण ती देण्याचं वेड किंवा छंद ह्या व्यक्तीला गप्प बसू देत नाही. ह्या ह्या तारखेची ही नोट उदा.2561995 ही जन्म तारीख ज्याची आहे त्याने कळवावे असा संदेश ग्रुपवर येतो. ग्रुपमध्ये 1500 सदस्य आहेत त्यापैकी ज्याची ही तारीख असेल त्याला ती सप्रेम भेट मिळते.
छंद अनेक प्रकारचे असतात, वाद्य जमवण्याचे, गाणी जमवण्याचे, तिकिटे गोळा करणे, काडेपेट्यांची रंगीबेरंगी चित्रे असलेली, डिझाईन असलेली कव्हर गोळा करणे, वेगवेगळी नाणी, नोटा साठवणे, बायकांना वेगवेगळ्या आकारांची भांडी जमा करण्याचे, कुणाला पक्षी तर कुणाला वेगवेगळे रंगीबेरंगी मासे जमा कारण्याचा छंद. हा छंद जीवाला लावी पिसे अशी तऱ्हा. मलाही नाट्यगीते, क्लासीकल गाणी, जुनी गाणी, सर्वप्रकारचे गाण्याचे कलेक्शन करण्याचा छंद आहे तसेच वेगवेगळी देशी परदेशी नाणी, नोटा गोळा करण्याचा छंद होता आणि हं तुळशीबागेत नवीन काही आलं की ते घरात यायलाच पाहिजे मग ते नवीन फॅशनचे दागिने, कपडे किंवा नवीन कॉस्मेटिक असो… हे वेड लहानपणापासूनचे आहे. माझे वडील अण्णा गमतीने म्हणायचे देखील हा सर्व खजाना तुला लग्नात असाच्या असा आंदण देणार म्हणून. माणसाचा छंद त्याला कुठल्या कुठे नेऊन सोडेल सांगता येत नाही. कुणाला फक्त दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचे वेड असते तर कुणाला उपकार करून घेण्याचे. कुणाला बाग बगिच्या फुलवण्याचे तर कुणाला गजऱ्यांचे म्हणजे गजरे माळायचे.
माझ्याकडे कायम गजरेवाल्याचा रतीब असे. रोज 6 गजरे देऊन जाई आणि महिन्याला पैसे घेऊन जाई! खरेदीचे वेड. असेच तुळशी बाग, लक्ष्मी रोडवर गेले की शेवटचा रुपाया संपेपर्यंत खरेदी मग रिक्षा करून घरी यायचे आणि घरातून आणून रिक्षावाल्याला पैसे द्यायचे. लहान मुले मोटार गाड्या तर मुली बाहुल्यांचे प्रकार जमवतात. माझ्या नातीकडे जवळ जवळ 100 ते 150 बाहुल्या आहेत. 100 रुपयांपासून 13,000 रुपायांपर्यंत! त्यांच्या किमती आहेत. आसनी माझ्याकडे तेवढ्याच पर्सेस आणि बॅग्ज आहेत. अर्धे कपाट त्यांनीच गच्च भरले आहे. मुले थोडी मोठी झाली की आपापल्या आवडीच्या हिरो हिरोईन आणि गायक गायिकांचे फोटो जमा करतात आणि आपली रूम, कपाटे सजवतात. तर असे हे छंद आवडी… जगी हा खास वेड्यांचा पसारा आहे सारा. हेच खरे.
अनुराधा पवार