उन्हाळ्याची चाहुल : कलिंगडाची आवक वाढली
पिंपरी – मागील आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागताच गारवा देणारी कलिंगडे बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. सध्या बाजारात विविध जातीच्या कलिंगडाची आवक वाढली असली तरी गडद हिरव्या रंगाच्या “शुगरकिंग’ वाणाच्या कलिंगडाने पिंपरी-चिंचवडकरांना भुरळ घातली आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या उतरार्धातच तापमान पस्तीशीपार झाल्यामुळे उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे, फेब्रुवारी महिन्यातच गारवा देणारी फळे बाजारात दाखल होऊ लागली आहे. द्राक्षाबरोबरच कलिंगडाचा हंगामही यावर्षी लवकर सुरू झाला आहे. त्याच उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे सध्या कलिंगडाला मागणी वाढली आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीच्या उपवासासाठी इतर फळापेक्षा कलिंगडालाच अधिक मागणी होती. मागणी वाढल्यामुळे सहाजीकच पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारात कलिंगडाची आवक वाढली आहे. सध्या शहरात पुणे तसेच सांगली, कोल्हापूर, सोलापूर, गुलबर्गा व कर्नाटक सीमा भागातून कलिंगडाची आवक सुरू आहे. गडद हिरव्या रंगाची कलिंगडे “शुगर किंग’ नावाने ओळखली जातात. नावाप्रमाणेच या कलिंगडाला गोडवा अधिक असतो. त्यामुळे याच कलिंगडाला अधिक मागणी आहे.
हंगामाची सुरुवात नुकतीच झाल्यामुळे सध्या या कलिंगडाचे दर सरासरीपेक्षा जास्त आहेत. शुगरकिंग कलिंगडाला पिंपरी बाजारात प्रतिकिलो 22 ते 25 रुपये दर मिळत आहे. 1 किलो पासून ते 4 किलोपर्यंत कलिंगडाचे नग उपलब्ध आहेत. तर इतर कलिंगडाच्या जातीमध्ये किरण जातीच्या कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. या कलिंगडाचा दर प्रतिकिलो 17 ते 18 रुपये मिळत आहे. यासोबतच फिक्कट हिरवे पट्टे असणारे लांबट आणि आकाराने मोठे असणारे नामधारी जातीचे कलिंगडही बाजारात दाखल झाले असून, या कलिंगडाचा दरही किरण जातीच्या कलिंगडाप्रमाणेच आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच विविध जातीच्या कलिंगडाची बाजारात आवक होत असली तरी शुगरकिंग जातीच्या कलिंगडाला पिंपरी-चिंचवडकरांनी पसंदी दिली आहे. आता पुढील महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर कलिंगडाची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.