सात गुन्हे उघडकीस, गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी
पिंपरी – भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने तो गल्लोगल्ली फिरायचा. संधी मिळताच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातील महागडे साहित्य चोरायचा. अशा भंगारवाल्या चोराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांकडून अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दोन्ही आरोपींकडून चार पोलीस ठाण्यातील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुबारक मज्जीत कुरेशी (वय 19, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार शिवानंद स्वामी यांना माहिती मिळाली की, पिंपरी डेअरी फार्म जवळ दोघेजण संशयितरित्या फिरत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.
आरोपी मुबारक आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांकडून एक मोटारसायकल, नऊ मोबाईल फोन, इलेक्ट्रिक पॉली कॅब वायरचे नवीन बंडल आणि प्लम्बिंगचे साहित्य असा एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचे तीन गुन्हे, निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा, पुणे शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यातील चोरीचे दोन असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी मुबारक हा त्याच्या अल्पवयीन साथीदारासोबत भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने नागरिक वस्तीमध्ये फिरायचा. फिरताना वस्तीत घरांची पाहणी तो करायचा. ज्या घरांचे दरवाजे उघडे आहेत, त्या घरात जाऊन मिळेल ती वस्तू चोरी करायचा नागरिकांनी अशा संशयित व्यक्तींपासून साधावा राहावे, तसेच वेळीच पोलिसांना माहिती द्यावी. सोसायटी मधील सुरक्षा रक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.