खडकवासला -पुणे-पानशेत रस्त्यावर गोऱ्हे खुर्द येथे भरधाव वेगातील कार उलटून झालेल्या अपघातात एक तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पानशेत कडून पुण्याकडे येताना बुधवारी (दि. 27)सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
भूषण रोहिदास किवळे (वय 25, रा. नांदोशी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर गंधार उत्तेकर, निखिल पेठारे आणि अमर सुगुर (तिघेही सध्या रा. धायरी) अशी जखमी तरूणांनी नावे आहेत. भूषण यांच्या मालकीची टोयाटो अर्बन क्रुझर या गाडीतून भूषण आणि इतर तिघे पानशेतकडून पुण्याकडे येत होते. खानापूरच्या आधी आडगाव खुर्द गावाच्या हद्दीत शौर्य हॉटेलजवळ भूषणचे भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटले.
कार उजवीकडे मोकळ्या पटांगणात जाऊन दोन-तीन वेळा उलटली. यात भूषण गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. तर तिघांना उपचारासाठी वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधु यांच्यासह पोलीस हवालदार रामदास बाबर, अजय पाटसकर यांनी जखमींना खासगी रूग्णालयात दाखल केले.