इंदापूर -राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भिगवण तसेच तालुक्यातील गावागावांत जामा मस्जिदमध्ये आयोजित इफ्तार पार्टींमध्ये सहभागी होऊन त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडण झाली आहे. तालुक्याला कर्मयोगींच्या धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा लाभलेला आहे. तो वसा जपण्याचा प्रयत्न केला जाईल. सत्तेमध्ये असताना लुमेवाडी (ता. इंदापूर) येथील दर्ग्याच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. इंदापूर, भिगवण, बावडा आदी ठिकाणच्या मस्जिदीच्या विकासासाठी योगदान दिले.
शैक्षणिक व सहकारी संस्थांमध्ये मुस्लीम समाजाला योग्य प्रतिनिधीत्व दिले आहे. विरोधक केवळ राजकीय स्वार्थासाठी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मागील 70 वर्षांमध्ये मुस्लीम समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे व प्रामाणिक प्रयत्नांचे समाजाने अवलोकन करावे.
कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुतराव वणवे, इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे, कर्मयोगीचे संचालक पराग जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, सरपंच तानाजी वायसे, सिराज शेख, संपत बंडगर, प्रा. तुषार क्षीरसागर, तेजस देवकाते, सुनिल वाघ, प्रशांत वाघ, रणजित निकम, जाफर मुलाणी,
डॉ. महंमद मुलाणी उपस्थित होते. इंदापुर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जावेद शेख यांनी केले. सूत्रसंचालन मेहमुद मुलाणी यांनी केले. सलीम सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन हबीब तांबोळी, रियाज शेख, मौलाना असद, अब्दुल मुलाणी, रियाज बागवान, फिरोझ शेख आदींनी केले.