कराड -गेल्या काही महिन्यांपासून येथील बस स्थानकात पारधी समाजातील फिरस्त्या कुटुंबांनी तळ ठोकला होता. त्यांचे खानेपिणे राहण्यासह प्रपंचाच कराड बस्थानकात सुरू होता. याचा प्रचंड त्रास येथील आगार व्यवस्थापनासह प्रवाशांना होत असल्याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मुक्काम ठोकून बसलेल्या पारध्यांना हुसकावून लावले.
फिरस्त्या कुटुंबांना “कोणी घर देता का घर’ शिर्षकाखाली या कुटुंबांची परवड तसेच त्यांनी कराड बस स्थानकात थाटलेल्या संसाराचे सचित्र वृत्त दैनिक प्रभातने प्रसिध्द करत आवाज उठवला होता. कराडच्या आयडॉल बस स्थानकात पारध्यांचा उपद्रव वाढल्याचा सातत्याने तक्रारी होत होत्या. या तक्रारींची गांर्भीयाने दखल घेत वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनखाली शहरा पोलिसांनी विशेष मोहिम राबवली. येथील पारध्यांचा मुक्काम रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कारवाई करत हुसकावून लावला.
कराड तालुक्यात फिरस्त्या पारधी समाजातील कुटुंबाचे पुर्नवसन पोलीस प्रशासनाने महसूल विभागाच्या सहकार्यातून करण्यात आले आहे. येथील ओगलेवाडी, कार्वे, वहागाव, शेणोलीस्टेशन, आगाशिवनगर आदी ठिकाणी पुर्नवसन करून जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, तेथे बांधीव घर नाही. मुलभूत सुविधा नाहीत. स्थानिक लोकांचा त्रास असल्याचे सांगत या कुटुुंबांनी कराड शहराला आपले घर बनवले आहे.
यापूर्वी येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूलाखाली त्यांचा मुक्काम होता. येथेही त्यांचा रउपद्रव वाढला. ये-जा करणाऱ्या वाहनचालक तसेच नागरिकांना त्यांचा त्रास होऊ लागला. चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाण वाढले. नागरिक व प्रवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने या फिरस्त्यांची पुर्नवसन ठिकाणी रवानगी केली. पारधी समाजाचे नेते प्रकाश वायदंडे यांनी याकामी मोलाचे सहकार्य केले होते. याशिवाय माणुसकीच्या भावनेतून संबंधित कुटंबीयांना खाण्यापिण्याचे साहित्य देऊन शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील त्यांना ओगलेवाडीतील पुर्नवसन ठिकाणी रवाना केले.
मात्र, ओगलेवाडी येथे पुर्नवसन केलेल्या फिरस्त्या कुटुंबांकडे रेशनकार्डसह सर्व शासकीय दस्ताऐवज असतानाही त्यांना पुर्नवसित राहिण्यासाठी घर नाही. वीज व पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. अशा परिस्थिती आम्ही तेथे राहणार कसे? आमची पोरबाळ जगणार कशी? तसेच येथील स्थनिक लोकांचाही आम्हाला विरोध आहे. त्यामुळे आम्ही तेथून परत आलो असल्याचे बस स्थानकात संसार मांडून बसलेल्या फिरस्त्या कुटुंबातील महिला सांगत आहेत.
मात्र, या फिरस्त्या लोकांचाही पुर्नवसन ठिकाणी उपद्रव वाढल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कराड बसस्थानकातील निवारा शेड तसेच रनवेवर या कुटुंबांचा मुक्काम राहिल्याने येथील आगार व्यवस्थापनाला त्यांचा प्रचंड त्रास होऊ लागला होता. येथे येणाऱ्या बस चालकांना वाहन चालवणे अवघड झाले होते. शिवाय ये-जा करणाऱ्या प्रवशांनाही त्यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अखेर बसस्थानक व नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विशेष मोहिम राबवत बसस्थानक परिसरात वास्तव्यास असलेल्या फिरस्त्या पारधी समाजातील कुटुुंबांना हुसकावून लावले. या कारवाईने कराड बस स्थानकाने मोकळा श्वास घेतला असून पोलीस कारवाईचे स्वागत होत आहे.